सांगली : मिरजेपाठोपाठ सांगली शहरातही गॅस्ट्रोचे रुग्ण आढळत आहेत. गेल्या दोन दिवसात सांगलीच्या शासकीय रुग्णालयात १३ रुग्ण दाखल झाल्याने सांगलीकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज, रविवार दिवसभर गॅस्ट्रोच्या रुग्णांची उपचारासाठी रुग्णालयात गर्दी होती. खुदबुद्दीन नबीसाब मुजावर (वय २७, रा. शंभरफुटी रस्ता), जितेंद्र अशोक शिंदे (३०, शिंदे मळा), सुभाष बनवारी स्वामी (२५, यशवंतनगर), प्रकाश रामचंद्र हाक्के (४०, खणभाग), सोनाली अनिल माने (२७, जमदाडे गल्ली), सारिका विनोद कांबळे (२४, मुख्य एसटी बसस्थानक रस्ता), पुष्पा दामोदर बंदीवाडेकर (७०, चिंतामणीनगर, सांगली) अरीफा गफूर हळंद्री (३८) तुळशीदास टाकेद (२५ दोघे रा. कुपवाड), सुखदेव विठ्ठल माळी (४०, कवलापूर, ता. मिरज), अथर्व दत्तात्रय चौगुले (१, कवठेएकंद, ता. तासगाव), विजय सतगोंडा कांबळे (३४, जैनापूर, ता. शिरोळ), कमल विलास सुतार (६०), अनिता संजय कांबळे (४५, दोघे रा. चिप्री, ता. शिरोळ) अशी या रुग्णांची नावे आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील तुळशीदास टाकेद यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.गेल्या आठ दिवसांपासून या रुग्णांना ताप, उलटी व जुलाबाचा त्रास सुरु होता. खासगी रुग्णालयात त्यांनी औषधोपचार घेतले. मात्र त्यांची प्रकृती खालावतच गेली. यामुळे ते शासकीय रुग्णालयात दाखल झाले. मिरजेतही गेल्या चार दिवसांपासून गॅस्ट्रोच्या आजाराने थैमान घातले आहे. आतापर्यंत चौघांचा बळी गेला आहे. अनेक रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सांगलीतही त्याची सुरुवात झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातही गॅस्ट्रोचे रुग्ण आढळत आहेत. दूषित पाण्याचा ग्रामीण भागात पुरवठा होत आहे. यामुळे ग्रामपंचायतीकडून गावात पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले जात आहे. त्यास नागरिकांचा कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने गॅस्ट्रोचे रुग्ण आढळत आहेत. शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर प्रथम अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना वॉर्डात हलविले जात आहे.शहरातील खासगी रुग्णालयात ताप, उलटी व जुलाबाचे रुग्ण दाखल होत आहेत. त्याची माहितीही जिल्हा आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे. साथ पसरु नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. नागरिकांनी काय काळजी घ्यावी, याची जनजागृती करण्यासाठी पत्रकांचे वाटप केले जात आहे. कवलापूर, कवठेएकंद या गावात दररोज गॅस्ट्रोचे रुग्ण आढळत आहेत. कवलापुरात काही दिवसांपूर्वी दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा केला होता. त्याचा परिणाम ग्रामस्थांच्या आरोग्यावर झाल्याचे दिसून येते. गावातील खासगी रुग्णालयांत ग्रामस्थ उपचार घेत आहेत. (प्रतिनिधी)ग्रामीणसह शिरोळमधील रुग्णसांगली शहरासह ग्रामीण भागातील तसेच शिरोळ तालुक्यातीलही गॅस्ट्रोचे रुग्ण येथे उपचारासाठी दाखल होत आहेत. त्यांच्या विविध तपासण्या केल्या जात आहेत. काल (शनिवार) एकाचदिवशी १३ रुग्ण दाखल झाले आहेत. आज, रविवार पुन्हा नव्याने तीन रुग्ण आले. एकाचवेळी एवढे रुग्ण दाखल झाल्याने रुग्णालय प्रशासनाची पळापळ सुरु आहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. ए. कुरेकर यांनी रुग्णांवर सुरु असलेल्या उपचाराचा आज सकाळी आढावा घेतला. रुग्णालय परिसरात त्यांनी स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश दिले. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हांकारे यांनी या रुग्णांची माहिती घेतली.
सांगलीतही गॅस्ट्रोचे १३ रुग्ण
By admin | Updated: November 23, 2014 23:58 IST