आष्टा : येथील लोकमान्य औद्योगिक वसाहतीमधील गॅस टाकी वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अचानक आग लागली. मात्र, आष्टा नगर परिषद अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझविली आणि मोठा अनर्थ टळला.
येथील आष्टा - तासगाव रस्त्यावर लोकमान्य औद्योगिक वसाहतमध्ये लोकमान्य इंडेन गॅस गोडाऊन आहे. तेथे गॅस टाक्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास आग लागली. ही आग चंद्रकांत कोकाटे यांच्या निदर्शनास आली. सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
या गोडाऊनमधील कर्मचारी कामकाज आवरून गेटला कुलूप लावून निघून गेले होते. रात्री गोडाऊनच्या पार्किंगमध्ये लावलेल्या टेम्पोच्या चालक सीटच्या बाजूने आग लागल्याचे लक्षात येताच चंद्रकांत कोकाटे यांनी कस्तुरी फौंड्रीच्या सिक्युरिटी विभागास माहिती दिली. त्यांनी आष्टा पालिकेच्या अग्निशमन विभागास कळवले. आष्टा पालिकेचे अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बंद गेटवरून उडी मारून टेम्पोला लागलेली आग विझविली. गोडाऊनमध्ये भरलेले व मोकळे गॅस सिलिंडर होते. लवकर आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.