फोटो ०३ गीतांजली उपाध्ये
फोटो ०३ सुनीता शेरीकर
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दर महिन्याला महागणाऱ्या गॅसमुळे ग्राहकांच्या संतापाचा भडका उडत आहे. ग्रामीण भागात जळण, चुली, शेगड्या व बंब आदी पर्याय आहेत, पण शहरात जागेअभावी असा कोणताही पर्याय नाही. गृहिणींनी `आता फ्लॅटमध्ये चुली पेटवायच्या का?` अशा संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला गॅसची दरवाढ होत आहे. अनुदान संपविण्याच्या नावाखाली सरकार २५ ते ५० रुपयांनी गॅसदर वाढवत आहे. याच गतीने काही दिवसांनी घरगुती व व्यावसायिक सिलिंडर एकाच दराला मिळण्याची भीती आहे. गेली दोन-तीन वर्षे गॅसची सातत्याने दरवाढ होत असल्याने गृहिणींनी काटकसर सुरू केली होती, पण त्याच्या मर्यादाही आता संपल्या आहेत.
बॉक्स
सबसिडी बंद, रॉकेलही गायब
- शासनाने मे २०२० पासून घरगुती गॅसवरील सबसिडी पूर्णत: बंद केली आहे. खुल्या दरानुसार गॅस ग्राहकाला घ्यावा लागत आहे.
- गॅसच्या बचतीसाठी रॉकेलचा वापर घरोघरी व्हायचा, पण काही वर्षांपासून रॉकेलदेखील गायब झाल्यामुळे गृहिणींची कोंडी झाली आहे.
- प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला गॅसची नवी किंमत जाहीर होते. कधी स्वस्त, तर कधी महागतो. पण वर्षभरापासून तो कधीही स्वस्त झालेला नाही.
बॉक्स
व्यावसायिक सिलिंडरच्या दरवाढीने हॉटेलचालक मेटाकुटीला
व्यावसायिक सिलिंडरचीही सातत्याने दरवाढ सुरू आहे. सध्या १८ किलोचा सिलिंडर १ हजार ६७० रुपयांनी घ्यावा लागत आहे. घरगुतीपेक्षा व्यावसायिक सिलिंडरच्या दरवाढीचे प्रमाण जास्त आहे. त्याचे परिणामही सामान्य नागरिकांनाच सोसावे लागत आहेत. गॅस दरवाढीमुळे हॉटेल व्यावसायिकांनीही पदार्थांचे दर वाढवले आहेत.