लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मोटारसायकली चोरून त्या विकणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली. सुमित मारुती सिंदगी (वय १९, रा. कर्नाळ रोड, माधवनगर), अशिष गजानन मोरे (१९, रा. विश्रामबाग, सांगली), अनिस यासीन मुजावर (१९, रा. चैतन्यनगर, संजयनगर, सांगली) व अभिषेक शामराव देवकुळे (२०, रा. साठेनगर, तासगाव) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे असून, त्यांच्याकडून सहा लाख ३५ हजार रुपये किमतीच्या १४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात वाढत चाललेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी खास पथक तयार केले होते. गुरुवारी पथक गस्तीवर असताना, शहरातील नेमिनाथनगर येथील मैदानाजवळ तिघे तरुण संशयास्पदरित्या दुचाकी विकण्यासाठी थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांनी त्यांच्याकडील दुचाकी चोरीच्या असून, आणखी दुचाकी सांगलीत एका ठिकाणी व सात मोटारसायकली तासगाव येथे देवकुळेजवळ सापडल्या. विविध ठिकाणाहून चोरलेल्या १४ मोटारसायकली सापडल्या असून, आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सांगली शहरात गेल्या काही दिवसात झालेल्या दुचाकी चोऱ्यांचा यामुळे छडा लागणार आहे.
सहाय्यक निरीक्षक निरज उबाळे, प्रशांत निशानदार, नवनाथ दांडगे, जितेंद्र जाधव, सागर टिंगरे, संतोष गळवे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
चौकट
चोऱ्यांमध्ये वाढ
गेल्या काही महिन्यांपासून शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. दिवसाला सरासरी दोन दुचाकी लंपास होत होत्या. एलसीबीने जेरबंद केलेल्या टोळीकडून एकाचवेळी १४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्याने अजूनही काही गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे.