लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येत्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्यासाठी शासन व पोलीस प्रशासनाने परवानगी द्यावी, या मागणीसाठी मावळा प्रतिष्ठानच्या वतीने येथील कर्मवीर चौकात गांधीगिरी करीत निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात फलक घेत परवानगी देण्याची मागणी केली.
मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऋषीकेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरवर्षी मावळा प्रतिष्ठानच्या वतीने सांगलीत शिवजयंती उत्साहात साजरी केली जाते. प्रतिष्ठानच्या वतीने रॅली काढली जाते. या रॅलीत पारंपरिक व सांस्कृतिक कलेचे दर्शनही होते. युवकांचा मोठा सहभाग रॅलीत असतो. यंदा शासनाने शिवजयंती साजरी करण्यावर बंधने घातली आहेत. त्याविरोधात मावळा प्रतिष्ठानच्या वतीने कर्मवीर चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी शिवजयंती साजरी झालीच पाहिजे, शासनाने परवानगी द्यावी, अशा आशयाचे फलक झळकावले.
याबाबत ऋषीकेश पाटील म्हणाले, नाशिकसारख्या मोठ्या जिल्ह्यामध्ये शिवजयंती मिरवणुकीस परवानगी मिळाली आहे. सांगली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आहे. त्यामुळे सांगलीतही शिवजयंती साजरी करण्यासाठी व शिवजयंतीची सांस्कृतिक व पारंपरिक मिरवणूक काढण्यासाठी परवानगी मिळायला हवी. शिवजयंतीशी सर्व समाजाच्या भावना जोडलेल्या आहेत. त्याचा विचार करून शासनाने शिवजयंती साजरी करण्यास परवानगी द्यावी. यावेळी मावळा प्रतिष्ठानचे रोहित पाटील, अक्षय सावंत, जुनेद जमादार, हर्षल पाटील उपस्थित होते.
फोटो ओळी : शिवजयंती साजरी करण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी मावळा प्रतिष्ठानच्या वतीने कर्मवारी चौकात फलक झळकावत निदर्शने करण्यात आली.