पलूस : नगरपालिका हद्दीतील अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या प्रयत्नातून तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र लाड यांनी दिली.
लाड म्हणाले, डॉ. पतंगराव कदम यांनी पलूस शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर आता राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनीही शहराच्या विकासासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शासनाच्या विविध योजनांतून विकासकामे करण्यात येत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून राज्यमंत्री डॉ. कदम यांनी अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी तीन कोटींचा निधी मंजूर केला आहे.
या निधीतून पलूस शहरातील बाळूमामा मंदिर ते महाडिक वस्ती रस्ता रुंदीकरण, खडीकरण व डांबरीकरण करणे (४० लाख), बबनराव पाटील घर ते शिवाजीनगर रस्त्यास जोडणारा रस्ता सुधारणा (७५ लाख), परांजपे काॅलनीतील अंतर्गत रस्ता (२० लाख), मार्केट यार्डनजीक समर्थ काॅलनी येथील रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण (२० लाख), आंबेघर वसाहतीतील अंतर्गत रस्ते दुरुस्ती (३० लाख), विद्यानगर काॅलनीतील अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण (२५ लाख), शिक्षक काॅलनीतील अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण (२५ लाख), प्रभाग ६ मधील अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण (४० लाख), पलूस-आमणापूर रस्ता ते मोटकट्टी वस्ती रस्ता (२५ लाख) आदी रस्ते करण्यात येणार आहेत.