सांगली : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान योजनेतून जिल्ह्यातील २७२ आरोग्य उपकेंद्रांसाठी १८ कोटी दोन लाखांचा निधी मंजूर केला आहे. यातून फर्निचर, इमारतीची डागडुजी आणि रंगरंगोटी करण्यात येणार आहे. या सर्व कामावर राज्यस्तरावरूनच नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
जिल्ह्यात ३४४ आरोग्य उपकेंद्रांची संख्या आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या समितीने त्यांची पाहणी केली होती. तेथे मूलभूत सुविधांसाठी किती निधीची गरज आहे, तसेच किती आरोग्य उपकेंद्रांमध्ये दुरुस्ती करावी लागणार आहे, याचा अहवाल दिला होता. त्यानुसार जुन्या २७२ आरोग्य केंद्रांमध्ये दुरुस्तीची गरज होती. फर्निचर, गिलावा, दुरुस्ती, टाईल्स आणि संरक्षक भिंत आदी कामांसाठी प्रत्येक उपकेंद्राला पाच ते दहा लाखांचा निधी देण्यात येणार आहे. या कामाच्या निविदा राज्यस्तरावरूनच काढल्या आहेत. संबंधित ठेकेदारांची नावे निश्चित झाली असून, त्यांच्याकडून येत्या आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
चौकट
उपकेंद्रांचा कायापालट करणार : प्राजक्ता कोरे
मिरज तालुक्यांसाठी दोन कोटी ६५ लाख रुपये मिळाले आहेत. उपकेंद्राच्या दुरुस्तीच्या कामाचा प्रारंभ सोमवारी टाकळी (ता. मिरज) येथून केला आहे. येत्या सहा महिन्यांत सर्व उपकेंद्रांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी दिली.