गेली दोन वर्षे कोरोनासाथ व लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प असल्याने सामान्य गरिबांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. या काळात मिरज सिव्हिल कोरोना रुग्णालय म्हणून घोषित केल्यामुळे सर्वसामान्य गरीब रुग्णांची हेळसांड होत आहे. सध्या नॉन कोविड सर्वसाधारण आजारांवर खासगी रुग्णालयात उपचार घेणे गरिबांना परवडणारे नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे. अशा गरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून राष्ट्रीय शांतीदल व रहिमान फाउंडेशनतर्फे मिरजेत सात ठिकाणी जनता क्लिनिक सुरू केले आहे. मिरजेतील फिजिशियन व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नईम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध डॉक्टर्स जनता क्लिनिकमध्ये मोफत तपासणी व अत्यल्प दरात औषधउपचार करणार आहेत. सर्वसामान्य गरीब रुग्णांना याचा लाभ होणार आहे.
जनता क्लिनिकच्या संचालन मंडळात डॉ. मन्नान शेख, ॲड्. एम. ए. शेख, अल्लाउद्दीन काजी, मौलाना समिउल्ला, नौशाद मुल्ला, महमदहनीफ तहसीलदार, मुफ्ती सलीम, खुरशीद पठाण, मुफ्ती मारूफ, हिफजू रहेमान जमादार, दस्तगीर कुपवाडे, नारायण सूर्यवंशी, सलमान हेर्लेकर यांचा समावेश आहे.
चौकट
येथे असणार मोफत उपचार
या उपक्रमांतर्गत पहिले जनता क्लिनिक सांगली वेस मिरज येथे सुरू होत आहे. मिरज शहरात कृष्णाघाट, बुधवार पेठ, विजय कॉलनी, गुरुवार पेठ, कमानवेस व भारतनगर या परिसरात टप्प्याटप्प्याने जनता क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. डॉ. हाजी अ. रहिमान शेख मेमोरिअलतर्फे पहिल्या जनता क्लिनिकचे उद्घाटन दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सांगली वेस गुरुवार पेठ मिरज येथे होणार आहे.