फोटो ओळ : कुपवाड एमआयडीसी येथील कृष्णा व्हॅली चेंबरच्या आवारात शासनाच्यावतीने गरजूंना मोफत जेवण देण्यास प्रारंभ करण्यात आला. यावेळी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आर. के. भोसले, सुबोध नागमोती, बजरंग पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील आणि परिसरातील १०० गरजू गोरगरीब कामगारांना सकाळी ११ ते १ या वेळेत मोफत जेवण देण्यास सुरुवात केली आहे. कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड काॅमर्स व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सांगली कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता आर. के. भोसले, निरीक्षक सुबोध नागमोती यांनी दिली.
ते म्हणाले, राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे शासनाने १५ में पर्यत लाॅकडाऊन जाहीर केले आहे. या कालावधीत औद्योगिक वसाहतमधील अनेक उद्योगधंदे बंद आहेत. काही उद्योग सुरू आहेत. त्या कंपनीतील कामगार कंपनीच्या आवारात राहत आहेत. त्यांची उपासमार होऊ नये म्हणून हा उपक्रम राबविला आहे.
यासाठी कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड काॅमर्स व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सांगली कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा व्हॅली चेंबरच्या आवारात १ मे पासून दररोज सकाळी ११ ते १ या वेळेत गरजूंना, कामगार, मोलमजुरी, गोरगरीब अशा १०० जणांना मोफत जेवण देण्यास सुरुवात केली आहे.
यावेळी एमआयडीसीचे निरीक्षक सुबोध नागमोती, शिवसेना सांगली जिल्हा संघटक बजरंग पाटील उपस्थित होते.