लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील हॉटेल प्रियांका हे बीअर बार फोडल्याप्रकरणी कुपवाड पोलिसाकडून शुक्रवारी चार संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून विदेशी मद्याच्या बाटल्या, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि गुन्ह्यात वापरलेले तीनचाकी व दुचाकी वाहन असा तीन लाख आठ हजार ८४३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी चोवीस तासांत या चोरीचा छडा लावला आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितामध्ये अमोल अशोक घोरपडे (वय ३१, रा. ज्ञानगिरी वसाहत, सावळी), सागर निवास धनवडे (वय २३, रा. पंढरपूर रोड, मिरज), रोहित जगन्नाथ आवळे (वय २५, रा. शिंदे मळा, मिरज), गौतम लक्ष्मण कवटगी (वय १८, रा. टिंबर एरिया, सांगली) यांचा समावेश आहे.
पोलिसाची माहिती अशी की, कुपवाड एमआयडीसीतील हॉटेल प्रियांका हे बीअर बार गुरुवार ६ ते १८ मे २०२१ या कालावधीत कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी फोडले होते. ही घटना समजताच हॉटेल मालक रघुनाथसिंह राजपूत यांनी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली होती.
१९ मे रोजी सायंकाळी चोरीची तक्रार दाखल झाल्यानंतर कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाकडून चोवीस तासांत चोरीचा छडा लावून चौघा संशयिताच्या मुसक्या आवळण्यात आल्या. अटक केल्यानंतर पोलिसांनी चौघाकडे कसून चौकशी केली असता प्राथमिक तपासात संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून विदेशी मद्याच्या बाटल्या, सगणक, दोन स्क्रीन आणि गुन्ह्यात वापरलेली तीनचाकी रीक्षा, दुचाकी असा तीन लाख आठ हजार ८४३ रुपयांचा मुद्देमाल कुपवाड पोलीस ठाण्याच्या पथकाने जप्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे अधिक तपास करीत आहेत.