लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मान्सूनची जोरदार सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्यात गतीने पेरण्यांची कामे झाली. मात्र, अचानक पावसाने दडी मारल्याने चिंता व्यक्त होत आहे. अशातच आणखी चार दिवस तुरळक पावसाचाच अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला असल्याने चिंता वाढली आहे.
सध्या पावसाची मोठ्या आतुरतेने शेतकरी वाट पाहत आहेत. जूनमधील शेवटचे दहा दिवस व जुलैच्या सुरुवातीला पावसाने उघडीप दिली आहे. काही ठिकाणी केवळ तुरळक सरी हजेरी लावत आहेत. भारतीय हवामान खात्याने शनिवारी दिलेल्या अंदाजानुसार येत्या ७ जुलैपर्यंत जिल्ह्याच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. या काळात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे.
गेल्या तेरा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. शनिवारी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दिवसभर ऊन-सावलीचा खेळही रंगला होता.