इस्लामपूर : ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्याचा प्रादुर्भाव शहरावर होत आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मंगळवारपासून सलग चार दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी जाहीर केला. सोमवारी तहसीलदारांसमवेत होणाऱ्या बैठकीत त्याचे स्वरूप ठरणार आहे, तसेच कोरोना मृतांवरील अंत्यसंस्काराच्या खर्चात कपात करण्याचा निर्णय झाला.
येथील नगरपालिकेची ऑनलाइन सभा नगराध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या उपस्थितीत झाली. चार दिवसांच्या कर्फ्यूमध्ये औषध दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहे, तसेच घरपोहोच भाजीपाला व्यवस्था, शहराच्या सर्व सीमा सील करणे यासह बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटिजन चाचणी करून प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोरोना मृतांवर अंत्यसंस्कारासाठी होणाऱ्या खर्चात कपात करण्याची मागणी संजय कोरे, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, विश्वनाथ डांगे यांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेनुसार पूर्वी शहरातील मृतांसाठी २,१०० रुपये, तर बाहेरील मृतांसाठी ९ हजार रुपये घेतले जात होते. ते आता शहरासाठी १ हजार आणि बाहेरील मृतांसाठी ३ हजार रुपये अंत्यसंस्कारासाठी घेण्याचा निर्णय झाला.
डॉ. संग्राम पाटील यांनी, सॅनिटायझेशन योग्य पद्धतीने होत आहे, तसेच बाधित नागरिकांनी घरावर लावलेली स्टिकर काढू नयेत, अशी सूचना केली.
या सभेतील चर्चेत शहाजी पाटील, अमित ओसवाल, शकील सय्यद, वैभव पवार, प्रदीप लोहार, मनीषा पाटील, सुनीता सपकाळ, मंगल शिंगणे, जयश्री माळी, कोमल बनसोडे यांनी भाग घेतला.
‘लोकमत’ची मागणी वास्तववादी..!
शहरातील कोरोना संसर्गाची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. रस्त्यावर भरणाऱ्या भाजी बाजारात होणारी मोठी गर्दी प्रादुर्भाव वाढवत आहे. त्यामुळे किमान ७ दिवसांचा लॉकडाऊन करावा याकडे ‘लोकमत’ने प्रशासनाचे लक्ष वेधले होते. पालिकेच्या सभेत जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ‘लोकमत’ची मागणी ही जनतेच्या हितासाठी वास्तववादी होती, यावर शिक्कामोर्तब झाले.