सांगली : मिरजेत भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला. या छाप्यातील दोन संशयितांना पुढील कारवाईसाठी कार्यालयात आणण्यात आले. या संशयितांनी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करून कार्यालयातून पलायन केले. याप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी रमाकांत महाजन यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार कर्नाटकातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एम. नागलिंगा दुर्गाप्पा मुथ्थलकर (वय ३५), चंद्रशेखर गुडलाप्पा पल्लेदार (३८, दोघे गुर्गामा गुडी वेन्नकल, ता. हळकी, जि. विजापूर) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी माहिती अशी की, मिरजेतील ब्राह्मणपुरी परिसरात सूर्यफूल तेल, बटर व वनस्पती मिसळून भेसळयुक्त तूप बनविले जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी एम नागलिंगा व चंद्रशेखर पल्लेदार हे दोघे भेसळयुक्त तूप बनविताना मिळून आले. पथकाने या दोघांना पुढील कारवाईसाठी विजयनगर येथील कार्यालयात आणले. यावेळी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी दोघांनी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करून कार्यालयातून पलायन केले. याप्रकरणी दोघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.