चिपळूण : नाम ही आपल्या सर्वांची संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून येत्या पावसाळ्यात ग्लोबलबरोबर आपण १ लाख झाडे लावणार आहोत. लावलेली झाडे दोन पावसाळे जगवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. जेथे पाणीटंचाई आहे त्या भागात लोकसहभागातून नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून काम करण्याची तयारी आहे. येथे सादर झालेली कला पाहून आपण प्रभावित झालो आहोत. लोककला ही समाज प्रबोधन करणारी शक्ती आहे. जनजागृतीचे ते प्रभावी माध्यम आहे असे आघाडीचे विनोदी अभिनेते व नाम फाऊंडेशनचे संचालक मकरंद अनासपुरे यांनी केले. चिपळूण येथे रत्नागिरी पर्यटन महोत्सव २०१६ सुरु आहे. दुसऱ्या दिवशी सायंकाळी या महोत्सवाला अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी हजेरी लावली. यावेळी उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम गोलमडे, संयोजन समिती अध्यक्ष आमदार सदानंद चव्हाण, आमदार सुनील शिंदे, नामचे केशवराव आघाप, डॉ. प्रकाश खांडके, डॉ. गणेश चंदनशिवे, निरंजन भाकरे, ग्लोबलचे राम रेडीज आदी अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. नामने मराठवाड्यात जे काम केले आहे ते उच्च आहे. शासनापेक्षाही हे काम चांगले आहे. आम्ही आमच्या परीने मराठवाडा भागात दौरा करुन तेथील जनतेला आपापल्या परीने मदतीचा हात दिला आहे. अधिकारी व कर्मचारीवर्गाची बैठक घेऊन या जिल्ह्यातून सर्वांचे एक दिवसाचे वेतन दुष्काळग्रस्तांना दिले जाणार आहे. राजापूर येथे ५० एकर जागेवर गवत वाढवण्यात आले आहे. हे गवतही मराठवाड्यात पाठवले जाईल, असे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी सांगितले. नामचे केशवराव आघाप यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. वरळीचे आमदार सुनील शिंदे यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष गोलमडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदेश खेडेकर यांनी केले. (प्रतिनिधी)
लोककला ही समाजप्रबोधन करणारी शक्ती
By admin | Updated: May 10, 2016 02:28 IST