लाेकमत न्यूज नेटवर्क
मिरज : राज्यात काही ठिकाणी अंशतः लॉकडाऊन, तर काही ठिकाणी निर्बंध घालण्यात आले आहेत. येत्या काळात राज्यात लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने मिरजेत बाजार समितीच्या फूलबाजारात फुलांचे दर निम्म्यावर आले आहेत.
यावर्षी चांगल्या पावसामुळे फुलांचे उत्पादन उत्तम असल्याने बाजारात सर्व फुलांची आवक मोठी आहे. मात्र यात्रा, जत्रा रद्द झाल्या असून, जमावबंदीमुळे मंदिरे रात्री लवकर बंद होत आहेत. लग्नसराई सुरू असतानाही विवाह कार्यक्रमांवर निर्बंध आहेत. परिणामी फुलांच्या मागणीत घट होऊन भाव निम्म्याने खाली आले आहेत. तीनशे रुपये शेकडा असलेला गुलाबाचा दर शंभर रुपयांवर आला आहे. चारशे रुपये किलोने विक्री होणारी शेवंतीची फुले ८० रुपयांवर घसरली आहेत. हारांना मागणी नसल्याने गलांडा शंभरावरून २५ रुपयांवर आला आहे. लग्नसराईत गजऱ्यांचा दर तेजीत असतो. मात्र मागणीअभावी गजऱ्यांचे दरही सहाशेवरुन चारशे रुपयांवर आले आहेत. मिरज मार्केट यार्डातील फूल बाजारात जिल्ह्यातून विविध प्रकारची फुले व सजावट साहित्य विक्रीसाठी येते. यात्रा, जत्रा, सणासाठी फुलांची खरेदी करणारे व दररोज हार, घरपोच फुले देणारे किरकोळ विक्रेते खरेदी करतात. मात्र यात्रा, जत्रा रद्द झाल्याने व आगामी काळात लॉकडाऊनची शक्यता असल्याने पुन्हा गेल्यावर्षीसारखीच परिस्थिती होईल की काय, याची फूल उत्पादकांना चिंता आहे.
प्रतिकिलोचे दर
झेंडू : २०, मोगरा : ४००, शेवंती : १००- १२०, गलांडा : २५, गजरे : ४००
-------------
गुलाब (शेकडा) : १००, जरबेरा (१० नग) २५, कार्नेशियन (१० नग) : ५०, लिली (४० नग) : २०, डच गुलाब (२० नग) : ६०-७०
--------------------
कोरोनामुळे गतवर्षी फूल उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अत्यावश्यक वस्तू नसल्याने बाजार बंद होता. लॉकडाऊन लागल्यास पुन्हा एकदा नुकसान होणार आहे.
- अजित कोरे, फूलविक्रेते
----------------
येत्या काही दिवसात लॉकडाऊनच्या शक्यतेने फुलांची आवक वाढली आहे. मात्र मागणी नसल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. यापुढे मोठे सण, उत्सव नसल्याने फुलांना दर मिळणे कठीण आहे.
पंडित कोरे, फुलांचे व्यापारी.