पेठ (ता. वाळवा) येथे बुधवारी रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे येथील तिळगंगा ओढा दुतर्फा ओसंडून वाहत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : पेठ (ता. वाळवा) येथे बुधवारी दिवसा आणि रात्री पावसाने झोडपून काढल्यामुळे तीळगंगा ओढा दुतर्फा ओसंडून वाहू लागला. यामुळे मुख्य बाजारपेठ असणाऱ्या लहान-मोठ्या दुकानदारांची तारांबळ उडाली.
तीळगंगा ओढा सुरूल, रेठरेधरण, करमाळे या भागांतून वाहत तो बहे येथे कृष्णा नदीच्या पात्रात जाऊन मिसळतो. हा ओढा पेठ गावातून जात असल्याने अनेक बंधारे भरून रात्री दोन ते चारदरम्यान हा ओढा वाहू लागला. मुख्य बाजारामध्ये अनेक लहान-मोठी दुकाने उभारण्यात आली आहे.
या भागातील व्यावसायिकांची पुरामुळे तारांबळ उडाली. अनेकांनी आपली खोकी इतरत्र हलविली. यामध्ये कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही; परंतु लाकूड वखारीतील अनेक लाकडे वाहून गेल्याचे दिसून आले. या ओढ्यावरील चार काजवे पूल पाण्याखाली गेले होते. यामुळे त्या भागातील नागरिकांचे हाल झाले. असा पाऊस सुरू राहिला तर पेठ, महादेववाडी जाणारा मार्ग बंद होऊ शकतो. या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे. शेतकरी शेतात पेरणी करण्याच्या मागे लागल्याचे दिसून येत आहे.