कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील जळीत प्रकरणात अटक करण्यात आलेला मुख्य संशयित किरण दत्तात्रय चव्हाण (वय २३, रा. कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) याने मंगळवारी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बेडीसह पलायन केले होते. त्यानंतर तो कोडोली येथे असल्याचे समजताच त्याच रात्री सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे व पोलीस तेथे पोहोचले, परंतु त्यांच्या डोळ्यादेखत किरण चव्हाण घरावरील कौले काढून पुन्हा पळून गेला.कासेगाव येथे गेल्या १५ दिवसांपूर्वी शेतातील वस्तीत असणारी घरे जाळण्याचा प्रकार किरण चव्हाण व कासेगाव येथील त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनी केला होता. याप्रकरणी पोलिसांनी दहा दिवसांनी तिघांना ताब्यात घेतले होते. परंतु किरण चव्हाण मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बेडीसह पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती.या घटनेनंतर पोलिसांनी किरण चव्हाण याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तो त्याच्या गावी असल्याचे समजताच रात्रीअकराच्या सुमारास कासेगावचे सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे व त्यांचे सहकारी तात्काळ कोडोलीत पोहोचले. कोडोली येथील त्याच्या घराला पोलिसांनी घेराव घातला, परंतु घराचा दरवाजा न उघडल्याने त्यांना आतमध्ये प्रवेश करता आला नाही. याचा फायदा घेत चव्हाण आतील बाजूने माळ्यावर जाऊन घराची कौले काढून पोलिसांदेखत पुन्हा एकदा पळून जाण्यात यशस्वी झाला.चव्हाणने घरावरून उडी मारून उसाच्या शेताचा लपण्यासाठी आसरा घेतला. मध्यरात्र असल्याने उसात जाण्याचे धाडस कोणीही केले नाही. ‘पोलिसांच्या स्वाधीन हो, अन्यथा तुझ्या कुटुंबियांना पकडून नेऊ’, असा दम पोलिसांनी दिला. मात्र किरणने कसलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पोलिसांनी किरणच्या पत्नीसह मुलांना ताब्यात घेऊन कासेगाव येथे आणले आहे. या सर्व प्रकारावरून कासेगाव पोलिसांची निष्क्रियता पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. दरम्यान, या जळीत प्रकरणातील दोन अल्पवयीन मुलांना कासेगाव पोलिसांनी इस्लामपूर येथील न्यायालयासमोर उभे केले. त्यांना सांगलीच्या बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आले. (वार्ताहर) थंड डोक्याचा गुन्हेगारकिरण चव्हाण थंड डोक्याचा खतरनाक गुन्हेगार आहे. त्याच्या अंगात विलक्षण चपळाई असून, तो उंचीवरून उडी मारण्यात पटाईत आहे. नदीमध्ये पोहायला गेल्यानंतर अर्धा तास पाण्याखाली राहून श्वास रोखण्याची त्याची खासीयत आहे. उंच झाडे, भिंतीवरही तो लीलया चढू शकतो.
फौजदारादेखत गुन्हेगाराचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2015 23:17 IST