सांगली : मिरज शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्याने केलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजारप्रकरणी रुग्णालयातील पाच जणांचे जबाब घेण्यात आले. काळाबाजार करताना सापडलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनवरील बॅच क्रमांकही खोडण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात आता या कुपीचा बॅच क्रमांकही मिळाला आहे.
मिरज शासकीय रुग्णालयातील कर्मचारी सुमित हुपरीकर व त्याचा मित्र दाविद वाघमारे या दोघांना रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करताना पोलिसांनी पकडले हाेते. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सुरुवातीला रुग्णालय प्रशासनाने इंजेक्शन चोरीला गेले नसल्याचे सांगितले होते. मात्र, काळाबाजार करताना जप्त केलेेले कुपी रुग्णालयातीलच असल्याचे मान्य करण्यात आले होते.
आता या प्रकरणात एक डॉक्टर, दोन औषधनिर्माता आणि दोन कर्मचाऱ्यांचे पोलिसांनी जबाब नोंदवून घेतले आहेत, तर खोडण्यात आलेले बॅच क्रमांकही आता मिळाल्याने तपासाला अधिक गती येणार आहे.