इस्लामपूर : खरातवाडी (ता. वाळवा) येथे उसाचा फड पेटविल्याच्या कारणातून झालेल्या खुनीहल्ला प्रकरणी पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे. येथील न्यायालयाने या सर्वांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
शंकर श्यामराव खरात (वय ६५), अमर शंकर खरात (३१), अजित शंकर खरात (३३), सचिन शंकर खरात (३६) आणि ओंकार तुकाराम खरात (२५, सर्व रा. खरातवाडी, ता. वाळवा) अशी अटक केलेल्या संशयित हल्लेखोरांची नावे आहेत.
या खुनी हल्ल्याप्रकरणी संग्राम श्यामराव मदने याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. खुनी हल्ल्याची ही घटना रविवारी २८ मार्च रोजी सकाळी ७ वाजता घडली होती. वरील पाच जणांनी संगनमत करून लोखंडी पाइप आणि काठाने हल्ला चढवत सागर मदने याच्या डोक्यात गंभीर दुखापत केली होती. लोखंडी पाइपच्या फटक्याने तो बेशुद्ध होऊन निपचित पडला होता. यावेळी भांडण सोडविण्यास आलेल्या शहाजी मदने, अधिक मदने, अमोल मदने यांनाही हल्लेखोरांनी मारहाण करून जखमी केले. आरडाओरडा झाल्यानंतर ग्रामस्थ आल्याने सर्व हल्लेखोर पळून गेले होते. पोलीस उपनिरीक्षक डी. पी. शेडगे यांनी पुढील पाच जणांना अटक करून सखोल तपासासाठी पोलीस कोठडी घेतली.