शिराळा : शिराळा तालुका कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. पहिला डोस ७०.३३ टक्के तर दुसरा डोस ३०.३६ टक्के लसीकरण झाले आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील यांनी दिली. लसीकरणात आरोग्यसेविका, डॉक्टरांचे मोठे सहकार्य लाभले आहे.
डॉ. पाटील म्हणाले, एक लाख ७३ हजार ३४० लोकसंख्या असून, १८ वर्षांवरील एक लाख २८ हजार ९६५ लोकसंख्या आहे. यामध्ये ९० हजार ६९७ लसीकरण झाले आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी ११७४, फ्रंटलाईन वर्कर २०५६, १८ ते ४५ वयोगटातील ३७ हजार २१९, ४५ वर्षांवरील ५० हजार २४८ लसीकरण झाले आहे. ३९ हजार १५७ दुसऱ्या डोसचे लसीकरण झाले आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी ७२२, फ्रंटलाईन वर्कर ९२४, १८ ते ४५ वयोगटातील २ हजार ८५७, ४५ वर्षांवरील ३४ हजार ६५३ लसीकरण झाले आहे.
यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, डॉ. विवेक पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, डॉ. अनिल बागल, गटविकास अधिकारी संतोष राऊत, योगेश पाटील, आरोग्यसेविका, डॉक्टर आदींच्या मार्गदर्शनाने लसीकरणात तालुका जिल्ह्यात प्रथम आला आहे.