शिरढोण : लांडगेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील अंगणवाडीने स्वच्छता अभियानअंतर्गत स्वच्छ अंगणवाडी स्पर्धेत पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे.मागील आठवड्यामध्ये लांडगेवाडी गावासह अंगणवाडी क्र. ४ ची पुणे विभागीय आयुक्त अर्जुन गुंडे व सहायक संचालक शिक्षण महामंडळ जुन्नरवार यांनी पाहणी केली होती. या अंगणवाडीने स्वच्छता अभियानअंतर्गत अंगणवाडी स्वच्छ सुंदर स्पर्धेत जिल्ह्यात गतवेळी प्रथम क्रमांक पटकावला होता. बोलक्या भिंती, परिसरातील स्वच्छता, वृक्षांची उत्कृष्ट निगा, दर्जेदार शिक्षण यावर भर देत यश मिळवले आहे.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानमध्ये लांडगेवाडीने सलग दहा वर्षांपासून तालुक्यात प्रथम क्रमांक तसेच या अभियानाअंतर्गत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या गावाला पाणी व्यवस्थापनास वसंतराव नाईक पुरस्कार, तंटामुक्त गाव विशेष पुरस्कार, निर्मल गाव पुरस्कार असे अनेक पुरस्कार या गावाने प्राप्त केले आहेत. तसेच येथील जिल्हा परिषद शाळेनेही स्वच्छता अभियानात भाग घेऊन जिल्ह्यात स्वच्छ शाळा असे अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.अंगणवाडी स्पर्धेचा निकाल समजल्यावर गावात फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष करण्यात आला. साखर व पेढे वाटप करण्यात आले. (वार्ताहर)
लांडगेवाडी येथील अंगणवाडी स्वच्छतेत पुणे विभागात प्रथम
By admin | Updated: August 12, 2014 23:15 IST