सांगली : शहरातील स्टेशन चौकातील पडक्या खोलीत बुधवारी आग लागली. या आगीत एक व्यक्ती बेशुद्ध पडला होता. महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या तत्परतेमुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचविण्यात यश आले. स्टेशन चौकातील एका जुन्या इमारतीला सायंकाळी अचानक आग लागली. इमारतीतून धूर येऊ लागल्याने नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांच्यासह जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आग विझवत असताना चिंतामणी कांबळे आणि सहकाऱ्यांनी इमारतीमध्ये कोणी आहे का याची खात्री केली असता आतमध्ये एकजण बेशुद्धावस्थेत पडलेला आढळून आला. जवानांनी त्याला तातडीने बाहेर काढत प्रथमोपचार दिले. यामुळे तो शुद्धीवर आला. आगीच्या घटनेत तो आतच अडकून पडला होता. त्याला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही आग लागली कशामुळे याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अग्निशमनच्या सतर्कतेमुळे व्यक्तीचे प्राण वाचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:22 IST