फोटो ओळ :
बेवनूर (ता. जत) येथे शार्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत डाळिंब बाग व ८० एकर क्षेत्रातील गवत जळून खाक झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : बेवनूर (ता. जत) येथे विद्युत खांबावर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे कृषिपंप, डाळिंब बाग व सत्तर ते ऐंशी एकर क्षेत्रातील गवत जळून खाक झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांंचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले, असा शेतकऱ्यांना आरोप आहे.
बेवनूर ते गुळवंची महावितरण कंपनीचा कैकाडी ट्रान्स्फाॅर्मर आहे. या ठिकाणी दोन खाबांदरम्यान शॉर्टसर्किटने ठिणग्या पडल्या व तार तुटून खाली पडली. खाली गवत असल्याने आग लागली. कडक ऊन व वाऱ्यामुळे काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. बघता बघता सत्तर ते ऐंशी एकर क्षेत्रातील गवत जळून खाक झाले.
आगीमुळे सुतार मळा येथील दादासाहेब वाघमोडे यांच्या कृषी पंपाचे वायर, पीव्हीसी पाईप जळाली आहे. आप्पासाहेब तुकाराम जाधव यांची दोन ओळीतील डाळिंबाची झाडे जळाली आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
येथील विद्युत खांबांवरील समस्येबाबत शेगाव महावितरण कंपनीच्या कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्यांकडे शेतकऱ्यांनी तक्रार केली होती. परंतु त्यांनी, अगोदर बिल भरा मग तुमची समस्या सोडवू, असे सांगितले होते. या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
चाैकट
चाैकशीची मागणी
या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करावी, तसेच जळालेली पिके, डाळिंब बागा व गवताचा पंचनामा करून त्याची नुकसान भरपाई मिळावी. अन्यथा महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. शेतकऱ्यांनी जत पोलीस ठाण्याला तक्रार केली आहे.