डफळापूर : डफळापूर (ता. जत) येथे पोलीस खात्याने लक्ष घातल्यामुळे अखेर पोलीस चौकी उघडी राहू लागली आहे. गुरुवारी आठवडा बाजारदिवशी पोलिसांनी एसटी स्टॅण्डवरील वाहतुकीची कोंडी दूर केली. ‘लोकमत’ने दि. ६ नोव्हेंबर रोजी ‘डफळापुरात पोलीस चौकी बंद असल्याने गैरसोय’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेऊन पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. या प्रकारामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.पंधरा गावांचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या डफळापूर येथे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील रस्त्याकडेला पोलीस चौकी आहे. येथे एक साहाय्यक फौजदार, हवालदार व दोन कॉन्स्टेबल अशी नेमणूक केली आहे. पोलीस खात्याच्या दुर्लक्षामुळे येथील पोलीस चौकी वारंवार बंद असे. एखादी मोठी घटना घडली तरच पोलीस फिरकत असत. भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. गेले सहा महिने पोलिसांच्या दुर्लक्षामुळे डफळापूर एसटी स्टॅण्डवर वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनचालकांना व ग्रामस्थांना त्रास सोसावा लागला. आठवडा बाजारादिवशी नेहमीप्रमाणे डफळापूर एसटी स्टॅण्डवर वाहतुकीची कोंडी होऊ लागली होती. परंतु एक साहाय्यक फौजदार व चार कॉन्स्टेबलनी नियोजनपूर्वक ही कोंडी दूर केली. डफळापुरात नेहमी पोलीस चौकी उघडी असावी, जतला हेलपाटे घालावयास लागू नयेत, रात्रीची गस्त सुरू ठेवावी, नेमणुकीच्या ठिकाणी थांबून नोकरी करावी, पोलीस चौकीत कायम पोलीस मुक्कामास राहावेत, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
..अखेर डफळापुरातील पोलीस चौकी उघडली-
By admin | Updated: November 16, 2014 23:54 IST