कुपवाड : शहरातील सुरेखा राजू सोलनकर (रा. नवीन महापालिका कार्यालयासमोर, कुपवाड) या महिलेला घरातून बाहेर बोलावून कौटुंबिक कारणातून दोन महिला व एका पुरुषाने मारहाण केली. यात ती जखमी झाली. तिच्यावर सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर दुसऱ्या गटातील दोन महिलाही जखमी झाल्या आहेत. दोन्ही गटांनी कुपवाड पोलिसात तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही गटांतील आठजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पल्लवी माने, सुरेखा सोलनकर, सारिका माने यांच्यासह अन्य पाच अनोळखींवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुरेखा सोलनकर व त्यांचा मुलगा हे दोघेजण महापालिका कार्यालयासमोर भाड्याने एका खोलीत राहतात. रविवारी संध्याकाळी संशयित पल्लवी माने व तिची आई अन्य एक पुरुषासह सोलनकर यांना खोलीतून बाहेर बोलावून घेऊन मारहाण केली. या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली. तिला नातेवाईकांनी सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू आहेत. सोलनकर हिने संशयित पल्लवी माने, तिची आई व अन्य एका पुरुषाच्या विरोधात कुपवाड पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
दुसऱ्या घटनेत जखमी पल्लवी माने हिने कुपवाड पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयित सुरेखा सोलनकर हिने नातेवाईकांना मोबाईलवरून फोन करून बोलावून घेतले. रिक्षातून आलेल्या चार महिला व सोलनकर अशा पाच महिलांनी मला व माझ्या आईला जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केली.