जत : कुंभारी (ता. जत) येथे पिसाळलेल्या कुत्र्याने पंधरा जणांवर हल्ला करीत चावा घेतला. गावातील अन्य कुत्र्यांवर तसेच पाळीव जनावरांवरही हल्ले केले. त्यामुळे त्रस्त गावकऱ्यांनी पाठलाग करून या कुत्र्याला ठार मारले.
कुंभारी येथे दोन दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला होता. हे कुत्रे कुंभारी परिसरात फिरत होते. नकळतच एखाद्याच्या अंगावर जाऊन त्याला चावत होते. यामुळे कुंभारी परिसरातील लोक भयभीत होते. काहीजण या कुत्र्याला शोधण्यासाठी त्याच्या मागावर होते. परंतु हे कुत्रे सर्वांना चकवा देऊन पसार होत होते. दोन दिवसात या पिसाळलेल्या कुत्र्याने कुंभारीतील जवळपास पंधरा लोकांचा चावा घेतला. यातील अनेकजण सांगली व मिरज येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. या पिसाळलेल्या कुत्र्यामुळे कुंभारीत भीतीचे वातावरण होते. शनिवारीही या कुत्र्याने अनेक जणांचा चावा घेतला होता. त्यामुळे ग्रामस्थांनी या कुत्र्याचा पाठलाग करून त्याला ठार मारले.
कुंभारी येथे पहिल्यांदाच पिसाळलेल्या कुत्र्याने अनेकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने सर्वेक्षण करावे, या कुत्र्याने ज्या लोकांचा व जनावरांचा चावा घेतला आहे त्या सर्वांना रेबिज प्रतिबंधक उपाययोजना म्हणून लस देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.