लेंगरे येथील प्रशांत दबडे यांचे भूड रस्त्यावर हॉटेल बंगाली नावाचा ढाबा व परमीट रूम, बिअरबार आहे. सध्या लॉकडाऊनमुळे हा ढाबा बंद आहे. त्यामुळे आत कोणीही कामगार राहण्यास नाही.
शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अचानक या हॉटेलला आग लागली. सुरुवातीला थोडी असलेल्या या आगीने काही वेळातच उग्ररूप धारण केले. बघता बघता या आगीने संपूर्ण इमारतीला वेढा दिला. आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही.
त्यानंतर नागरिकांनी या घटनेची माहिती विटा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली. त्यावेळी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर काही वेळातच आग आटोक्यात आली. तोपर्यंत हॉटेलमधील सर्व फर्निचर, कुशन, तीन फ्रिज, छत आदींसह सर्व साहित्य आगीत जळून भस्मसात झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. या आगीत सुमारे ८ ते ९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
फोटो : २४ विटा १
ओळ : लेंगरे येथे शनिवारी हॉटेल बंगाली ढाबाला भीषण आग लागली.