शिरटे : सोनकिरे (ता. कडेगाव) येथील भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक विठ्ठल पांडुरंग पाटील हे रेल्वे भुयारी मार्गासाठी भवानीनगर येथील ग्रामपंचायतीसमोर ५ एप्रिलपासून उपोषणास बसणार असल्याचे निवेदन संबंधित विभागांना देण्यात आले आहे. त्यांच्या उपोषणास अनेक पदाधिकारी, संस्था व ग्रामपंचायतींनी पाठिंबा दर्शविला आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भवानीनगर ते गणेशखिंडकडे जाणाऱ्या रेल्वे पुलाखाली पाणी साचले असून त्यामध्ये मोठ मोठे दगड आहेत. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. भवानीनगरहून आसद, पाडळी, सोनकिरे, चिंचणी या गावासह वांगी कारखाना व विट्याकडे जाण्यासाठी हा मार्ग सोयीस्कर ठरत आहे.
परंतु हा रस्ता रेल्वे लाईनखालून भुयारी मार्गाने जात आहे. या रस्त्याचे रुंदीकरण व्हावे किंवा येथे रेल्वे क्रॉसिंग गेट व्हावे, अशी अनेक वर्षांपासून मागणी आहे. याबाबत अनेक घोषणा, आंदोलने झाली आहेत. परंतु अजूनही हा प्रश्न लालफितीत अडकून पडला आहे.
या भुयारी मार्गातील रस्त्याची स्वच्छता करावी तसेच प्रस्तावित भूमिगत रस्त्याबाबत कोणती कार्यवाही झाली याची माहिती मिळावी.
हे काम वेळेत पूर्ण झाले नाहीतर ५ एप्रिलपासून भवानीनगर ग्रामपंचायत कार्यालयासमोर मी व माझी संघटना उपोषणास बसणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. पाटील यांचे उपोषणास सोनकिरे, चिंचणी, तडसर, पाडळी, आसद व वाजेगाव आदी ग्रामपंचायतींनी पाठिब्यांचे पत्र दिले आहे.