लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरुड : शिरसटवाडी (ता. शिराळा) येथील वयोवृद्ध शेतकरी राजाराम पांडुरंग शिरसट (वय ८३) यांचा बांध पेटविताना लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला. ही घटना साेमवारी दुपारी एक वाजता घडली. घटनेची नोंद कोकरुड पोलीस ठाण्यात झाली आहे.
राजाराम शिरसट यांची वाघाचा डोंगर परिसरात खळघाट परिसरात एक एकर शेती आहे. येथे ते शाळूसह अन्य पिके घेतात. यावर्षी शाळूत मका, भुईमूग, पावटा, आदी आंतर पिके आहेत. शाळू काढणीस आल्याने पाखरे, वानरे यांच्यापासून राखण करण्यासाठी ते सकाळी शेताकडे गेले होते. दुपारी एकच्या सुमारास शेताच्या शेजारील बांध आणि पालापाचोळा त्यांनी पेटविला. काही वेळाने झळा शाळूकडे येत असल्याचे पाहून ते आग विझविण्याचा प्रयत्न करू लागले. अचानक पाय घसरून ते पेटलेल्या आगीत पडले. ९० टक्केपेक्षा जास्त भाजल्याने होरपळून जागीच त्यांचा मृत्यू झाला. दुपारी नेहमीच्या वेळेत ते घरी न आल्याने नातू सुनील शेतात गेला. यावेळी हा प्रकार उघडकीस आला. त्याने ग्रामस्थांना बाेलावून घेतले. ग्रामस्थांनी त्यांना कोकरुड ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबतची फिर्याद पोलीसपाटील रघुनाथ शिरसट यांनी कोकरुड पोलिसांत दिली आहे. राजाराम शिरसट यांना एक मुलगा, एक मुलगी आहे. सायंकाळी उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.