बोरगाव : शेतकऱ्यांचा राजकारणासाठी वापर करणारे नेते आता कुठे गेले? मंत्रिपदाची स्वप्ने पडू लागल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून बाजूला गेलेल्या या नेत्यांना आता शोधण्याची वेळ आली आहे, अशी टीका आ. जयंत पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली. बोरगाव (ता. वाळवा) येथे आज रविवारी त्यांचा आभार दौरा पार पडला. यावेळी राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले, केंद्र शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे साखर उद्योग व शेतकरी अडचणीत आला आहे. हीच परिस्थिती राहिली, तर पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्टा संपुष्टात येऊन विदर्भासारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही. केंद्र शासन व राज्य शासनाने त्वरित निर्णय घेऊन यावर्षी तरी शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीप्रमाणे त्यांच्या खात्यावर सबसीडी देऊन वाचवावे व कारखाने वाचवण्यासाठी भविष्याचा वेध घेऊन मोलॅसिस निर्यातीचा परवाना द्यावा. सरकारने एफ. आर. पी. मधील फरक कारखान्याकडे न देता संबंधित शेतकऱ्याला त्याच्या खात्यावर द्यावा. कोरड्या वल्गना करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साखरेचा प्रश्न सोडवता येत नाही, ही खंत आहे. सरकारने पक्ष निष्ठा व राजकारण हे न पाहता साखर कारखाने व शेतकरी वाचवण्यासाठी पुढे यायला हवे. जर केंद्र सरकार व राज्य सरकारने कच्च्या साखर निर्यातीचा निर्णय सुरुवातीलाच घेतला असता तर, बऱ्याच कारखान्यांनी नोव्हेंबर पूर्वी कच्ची साखर निर्यात केली असती. परंतु तसे न झाल्याने केवळी तीन ते चारच कारखान्यांनी कच्ची साखर निर्यात केली आहे. आता हंगाम बंद व्हायला अवघा १0 ते १५ दिवसांचा अवधी राहिला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात शासन यावर तोडगा काढेल. यावेळी माणिकराव पाटील, रवींद्र बर्डे, बी. के. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकाश वाटेगावकर यांनी स्वागत केले. विकास पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सरपंच केशव वाटेगावकर, रामराव देशमुख, विष्णूपंत शिंदे, शहाजी पाटील, संजय पाटील, माणिक शा. पाटील, अशोकराव पाटील, उल्हास घाडगे, कार्तिक पाटील, उमेश पाटील, सर्जेराव देशमुख, युवराज कांबळे उपस्थित होते. (वार्ताहर)विरोधकांची व्यवस्था करूबोरगावने मला राजकारणाचे धडे दिले. इतर गावांपेक्षा बोरगावचे आणि माझे वेगळे नाते आहे. गावाला भेडसावणारा क्षारपड जमिनीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल. त्यासाठी प्रयत्न केले जातील. गावाने गावातीलच माझ्याविरोधी उमेदवारापेक्षा ८२ मते अधिक दिली यात समाधानी आहे. मी कोणावर नाराज नसून, भविष्यात माझ्याविरोधात या गावातून कोणीही उभारणार नाही, याची व्यवस्था करू, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
मंत्रिपदाच्या स्वप्नामुळे शेतकऱ्यांचे नेते गायब
By admin | Updated: March 30, 2015 00:15 IST