लोकमत न्यूज नेटवर्क
जत : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू होऊन पंधरा दिवस उलटले तरीही जत तालुक्याच्या सीमेवरील एक-दोन गावातच पाणी आले आहे. तालुक्यात पाणी पाेहाेचताच पाण्याचा वेग कमी झाल्याने उर्वरित भागात अद्याप पाणी आलेले नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी म्हैसाळ योजनेच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
म्हैसाळ योजनेच्या पाण्यातून तालुक्यातील तेवीस गावांतील दहा टक्के क्षेत्र ओलिताखाली आले आहे. आवर्तन सुरू झाल्यानंतर प्रतापूर ते डोर्लीदरम्यान पाणी आले. यानंतर आपोआप पाण्याचा वेग कमी होत असल्यामुळे डोर्लीच्या पुढे पाणी सरकत नाही. त्यामुळे तालुक्याच्या उत्तर भागातील बनाळी, अचकनहळ्ळी, शेगाव, जत, कोसारी, कुंभारी, वायफळ, तिप्पेहळ्ळी या भागातील शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
सध्या उन्हाळी मका, ऊस, कापूस, भुईमूग आदी पिकांची लागण सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे विहिरी व विंधन विहिरीतील पाण्याची पातळी वेगाने खालावत आहे. ओढे - नाले व तलावांतील पाण्याचा साठा कमी होऊ लागला आहे. यामुळे म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू झाल्यानंतर या भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, परंतु कालव्यातून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी असल्यामुळे पाणी पुढे सरकत नाही. डोर्लीपर्यंत पाणी आल्यानंतर पाठीमागून आपोआप पाणी बंद होते. यासंदर्भात या भागातील शेतकऱ्यांनी म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, पाण्याचा वेग वाढवू, असे सांगण्यात आले आहे.
चौकट
आजपासून पाण्याचा वेग वाढणार : विक्रम सावंत
म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा वेग वाढविण्याची सूचना म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. सध्या कमी प्रमाणात पाणी साेडण्यात येत असल्यामुळे प्रतापूर ते डोर्लीपर्यंत पाणी येऊन ते बंद होते. त्यापुढे पाणी अद्याप आले नाही. बुधवार दि. ३१ मार्चपासून पाणी उपसा वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार विक्रम सावंत यांनी दिली.