तासगाव : तासगाव तालुक्यात यापुढे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊच नयेत, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कंबर कसली आहे. शेतकऱ्यांच्या जागृतीसाठी रविवारपासून (ता. २०) गावा-गावात अभियान राबविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात वासुंबे गावातून होणार आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदतीसाठी संघटना पुढाकार घेणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.तालुक्यात विदर्भाप्रमाणे दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शासनाचे चुकीचे धोरण हेच यामागचे मुख्य कारण आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याऐवजी, कर्ज वसुलीचा तगादा मागे लावणाऱ्यांचीच हत्या करावी. कोणाकडून कर्ज वसुलीचा तगादा लावला जात असल्यास यापुढे स्वाभिमानी संघटनेशी संपर्क साधावा. संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. कर्जबाजारीपणामुळे यापुढे तालुक्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ नये, यासाठी स्वाभिमानी संघटना २० तारखेपासून गावा-गावात जनजागृती अभियान राबविणार आहे. याच अभियानांतर्गत लोकांकडून आर्थिक मदत गोळा करुन, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची माहितीही खराडे यांनी दिली.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, शेतकऱ्यांच्या बाबतीतले जाचक निकष बदलावेत, यासह अन्य मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी खराडे यांनी दिला. शेतकऱ्यांच्यामदतीसाठी स्वाभिमानी संघटनेकडून हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे. अडचणीत किंवा नैराश्येत असलेल्या शेतकऱ्यांनी हेल्पलाईनशी संपर्क साधल्यास, संघटनेकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक खाडे, सनत पाटील, गुलाबराव यादव, शरद शेळके, अर्जुन थोरात, सचिन पाटील, विशाल शिंंदे उपस्थित होते. (वार्ताहर)‘लोकमत’च्या बातमीने संघटना सरसावल्या ‘लोकमत’मधून तासगाव तालुक्यात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत तीन दिवस प्रकाशझोत टाकण्यात आला होता. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे भीषण वास्तव मांडण्यात आले होते. या बातम्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य संघटनाही शेतकऱ्यांसाठी सरसावल्या आहेत. तालुक्याचे राजकीय नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे मात्र अद्यापही या घटनेकडे दुर्लक्ष आहे.
‘स्वाभिमानी’चे रविवारपासून शेतकरी जागृती अभियान
By admin | Updated: December 15, 2015 00:42 IST