लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरमधील डॉक्टरांवर दाखल केलेले ॲट्रॉसिटीचे खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी तहसीलदार गणेश शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले, दि. २५ मे रोजी कोरोना कालावधीमध्ये हॉस्पिटलमध्ये सेवा देणारे काही डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांवर राजकीय सूड भावनेतून ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले आहेत. राजकीय फायद्यासाठी या कायद्याचा गैरवापर केला जात आहे. अशा गोष्टी वारंवार घडत राहिल्या तर वैद्यकीय सेवा देण्यासाठी डॉक्टर मंडळी तयार होणार नाही. या हॉस्पिटलद्वारे आपल्या परिसरातील अनेक रुग्णांना अल्पदरात चांगली सेवा मिळत आहे तरी प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन येथील डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांवर होत असलेला अन्याय लक्षात घेऊन तो दूर करावा अन्यथा त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही आंदोलन करतच राहू, असेही त्यांनी म्हटले.
या निवेदनावर पांडुरंग गायकवाड, प्रकाश सावंत, विलास पाटील, राहुल सावंत, धनाजी सावंत, वैभव कदम, अनिल देवळेकर, रवी पाटील, राहुल पाटील आदींच्या सह्या आहेत.