फोटो ओळ :
चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सांगता समारंभावेळी आमदार मानसिंगराव नाईक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बाबासाहेब पाटील, विराज नाईक उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : विश्वासराव नाईक साखर कारखाना इथेनॉल आणि सहवीज निर्मिती प्रकल्पाची क्षमता वाढविण्यासाठी प्रकल्प उभारणी सुरू करणार आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सांगता समारंभावेळी ते बोलत होते. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, युवा नेते विराज नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार नाईक म्हणाले की, सध्या इथेनॉलला शासनाने चांगला दर दिला आहे. तसेच याची मागणीही चांगली आहे. त्यामुळे उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती प्रकल्प, तसेच १५ मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या क्षमतेत वाढ करून २० मेगावॅट क्षमता करण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे उत्पन्न वाढून ऊस उत्पादक शेतकरी तसेच सभासदांना फायदा होणार आहे.
याप्रसंगी दिनकर पाटील, विजयराव नलवडे, विश्वास कदम, दत्तात्रय पाटील, तानाजी साळुंखे, विश्वास पाटील, विजयराव देशमुख, राम पाटील, युवराज गायकवाड, विजय पाटील, सचिन पाटील, राजू पाटील, भानुदास पाटील, धनाजी पाटील, दिनकर महिंद आदी उपस्थित होते. विजय थोरबोले यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास पाटील आभार मानले.
चौकट
निर्यातीचा फायदा
या हंगामात बाजारपेठेत कमी दरात साखर मागणी होत असल्याने एकही क्विंटल साखर खुल्या बाजारात न विकता निर्यात केली. १.७५ लाख क्विंटल साखर निर्यात केली असून आणखी ६० हजार क्विंटल साखर निर्यात करणार आहे. २५ दिवस जादा कारखाना सुरू राहून ७० हजार टन जादा ऊस गाळप करण्यात आले, अशी माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.