सांगली : आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज विमा योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोनाच्या अनुषंगाने सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ५० लाख रुपयांचे वैयक्तिक लाभाचे विमा कवच देण्यात आले आहे. आता यास मुदतवाढ मिळाल्याने जोखीम पत्करून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
-------------
ग्रामीण भागात पोस्टाची बँकिंग सेवा
सांगली : संचारबंदीमुळे बऱ्याच नागरिकांची बँक खात्यावर पैसे भरणे अथवा काढणे यांसारख्या आवश्यक सेवा उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होत आहे. तसेच या व्यवहारांसाठी बाहेर पडल्यास कोरोना प्रसाराचा धोका निर्माण होऊ शकतो. जिल्ह्यातील सर्व भागात पोस्टाची सोय उपलब्ध आहे. पोस्ट ऑफिसेसच्या विविध सुविधांचा वापर केल्यास बँकांमध्ये होणारी गर्दी कमी होऊन कोरोना संसर्ग कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पोस्टल बँक सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांगली आयपीपीबी शाखेच्या व्यवस्थापकांनी केले आहे.
-----------------
समडोळीतूून दुचाकी लंपास
सांगली : समडोळी (ता. मिरज) येथे घरासमोर लावलेली पाच हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञाताने लंपास केली. याप्रकरणी दादासाहेब अशोक काळी (रा. कोळी गल्ली, समडोळी) यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. बुधवार, दि. १९ मे रोजी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.
----
सांगलीत एकास मारहाण
सांगली : शहरातील शिवेच्छा हॉटेलजवळ एकास चौघांनी धमकी देत मारहाण केली. याप्रकरणी प्रदीप शंकर भोसले (रा. उत्तर शिवाजीनगर, सांगली) याने संजय लोंढेंसह तीन अनोळखींविरोधात विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. बुधवार, दि. १९ रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास संशयितांनी बोलावून घेत तुला बघून घेतो म्हणत मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
--------
रुग्णवाहिकांनी जादा बिल घेतल्यास तक्रारीचे आवाहन
सांगली : कोरोना बाधितांना उपचारास रुग्णालयापर्यंत पोहोचवणे व उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांना घरी जाण्यासाठी रुग्णवाहिकाचालकांनी माफक दरात व वेळेवर सेवा द्यावी, अशी सूचना देण्यात आली आहे. याच्या माहितीसाठी आरटीओ कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. रुग्णवाहिकांच्या चालकांकडून मंजूर भाड्यापेक्षा जादा दराची आकारणी केल्यास, कंट्रोल रूममध्ये तक्रार दाखल करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी केले आहे.