सांगली : गेल्या तीन महिन्यांपासून शहरातील व्यापार ठप्प आहे. व्यापाऱ्यांवर शासकीय देणी व कर्जाचे हप्ते भरण्यासाठी भीक मागण्याची वेळ आली आहे. यापुढे लाॅकडाऊन वाढविणार असाल तर शासकीय कर, कर्जावरील व्याज माफ करावे, अशी मागणी व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी केली.
शहा म्हणाले की, कोल्हापूरच्या तुलनेत सांगलीची रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. त्यात शहरातील स्थिती आटोक्यात असतानाही लाॅकडाऊन लावला जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांवर भीक मांगो आंदोलन करण्याची वेळ आली. व्यापाऱ्यांचा हा आक्रोश सरकारच्या कानापर्यंत तरी पोहोचला का? येत्या सोमवारपासून शहरातील सर्वच व्यवसाय सुरू करावेत. प्रशासनाला लाॅकडाऊन वाढवायचाच असेल तर एक वर्षाचे स्थानिक कर माफ करावेत, केंद्र व राज्याचे करातही सवलत द्यावी, विनातारण कर्ज वितरणाची व्यवस्था करावी, कर्जावरील एक वर्षाचे व्याज माफ करावे. या मागण्या मान्य असतील तर अवश्य लाॅकडाऊन वाढवावा. नाही तर आमची दुकाने, घर ही आमची जबाबदारी या न्यायाने व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, असे आवाहनही केले.