इस्लामपूर : साखराळे (ता. वाळवा) येथील गावठाणातील प्लॉट मिळावेत, या मागणीसाठी प्रजासत्ताक दिनापासून सलग आठ दिवस येथील प्रशासकीय कार्यालयासमोर सहकुटुंब उपोषणास बसलेल्या माजी सैनिकांनी आपले उपोषण बुधवारी स्थगित केले. प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी उपोषणस्थळी येऊन येत्या १० दिवसांत सखोल चौकशी करून न्याय दिला जाईल, असे लेखी पत्र दिल्याने हे उपोषण थांबविण्यात आले.
यावेळी आमदार सदाभाऊ खोत, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, नगरसेवक शकील सय्यद, लालासाहेब पाटील उपस्थित होते. प्रांताधिकारी पाटील यांनी चर्चा करून प्रशासकीय पातळीवर याबाबत तोडगा काढण्याचे प्रयत्न चालू असल्याची माहिती दिली. यावेळी आमदार खोत यांनी, या माजी सैनिकांना पुन्हा शासनाच्या दारात न्याय मिळविण्यासाठी मांडव टाकावा लागू नये, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, अशी सूचना केली.
त्यानंतर माजी सैनिक महेश उथळे, अर्चना सचिन पवार, गणेश बोकारे, सुभाष शिंदे यांना प्रांत पाटील यांच्या हस्ते सरबत देऊन हे उपोषण थांबविण्यात आले. यावेळी अरविंद पाटील, माजी सैनिकांचे कुटुंबीय आणि साखराळे ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ०३०२२०२१-आयएसएलएम-साखराळे उपोषण न्यूज
इस्लामपूर येथे प्लॉट मिळण्याच्या मागणीसाठी उपोेषणास बसलेल्या माजी सैनिकांना प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्या हस्ते सरबत देऊन हे उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी आनंदराव पवार, आमदार सदाभाऊ खोत, राहुल महाहिक, शकील सय्यद उपस्थित होते.