विटा : खानापूर तालुक्यातील चिखलहोळ येथील सेवानिवृत्त पोलीस हवालदार मधुकर नामदेव यमगर यांनी दुचाकीच्या डिकीत ठेवलेली दोन लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. ही घटना आज, सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास विट्यातील मार्केट यार्डातील प्राथमिक शिक्षक बॅँकेसमोर घडली. यमगर यांनी येथील स्टेट बॅँकेच्या शाखेत ठेव ठेवली होती. आज सकाळी अकरा वाजता त्यांनी स्टेट बॅँकेतील दोन ठेवपावत्या मोडल्या. त्या पावत्यांवरील काही रक्कम त्याच शाखेतील बचत खात्यावर ठेवून उर्वरित दोन लाख ५० हजार रुपये पिशवीत घेऊन त्यांनी दुचाकीच्या (एमएच १०-एपी-७२४०) डिकीत ठेवली. त्यानंतर ते प्राथमिक शिक्षक बॅँकेच्या शाखेत रक्कम ठेवण्यासाठी आले. दुचाकी लावून ते लघुशंकेसाठी गेले असता चोरट्यांनी डिकी फोडून त्यातील रोकड असलेली पिशवी लंपास केली. यमगर परत गाडीजवळ आले असता त्यांना डिकीची मोडतोड झाल्याचे दिसले. त्यावेळी डिकीतील अडीच लाखांची रक्कमही लंपास केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने विटा पोलीस ठाण्यात माहिती दिली. (वार्ताहर)स्टेट बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणीपोलिसांनी स्टेट बॅँकेच्या सीसीटीव्हीच्या फुटेजची तपासणी केली. मात्र, त्यांना संशयित आढळून आले नाहीत. विटा शहरातील मार्केट यार्डात आज जनावरांचा बाजार असतो. त्यामुळे भरदिवसा गजबजलेल्या ठिकाणाहून चोरट्यांनी अडीच लाखांची रक्कम लंपास केल्याने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. विटा पोलिसांत या घटनेची नोंद झाली असून, पोलीस उपनिरीक्षक अमोल शिंदे तपास करीत आहेत.
विट्यात भरदिवसा अडीच लाख लंपास
By admin | Updated: September 1, 2014 23:49 IST