सांगली : एसटीच्या सांगली विभागातील दहा आगाराकडील ४०७९ कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट महिन्यांचा पगार मिळाला नसल्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यात चालक, वाहक, तांत्रिक कर्मचारी, अधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यांच्या पगारासाठी किमान १४ कोटी रुपयांची गरज आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आधीच अनेकांना तुटपुंजा पगार असताना आता दोन महिन्यांचा पगारच झालेला नाही. अनेकांनी मिळेल ते काम करायला सुरुवात केली आहे. राज्यात एसटी सेवा सुरू झाल्याने पगार झाला नसतानाही अनेकांना कामावर हजर राहावे लागत आहे. जिल्ह्यातील ४०७९ एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला आहे. जुलैचा पगार झाला नसताना ऑगस्टचा पगारही रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचारी संकटात सापडले आहेत. राज्यात सेवा द्यायची आहे; पण कर्मचाऱ्यांना पगार देणे शक्य नाही, अशा अवस्थेत एसटी महामंडळ आहे. राज्य सरकारने अनुदान द्यावे आणि आर्थिक कोंडी सोडवावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे.
चौकट
शासनाने निधी द्यावा : अशोक खोत
एसटी कर्मचारी आर्थिक कोंडीत सापडला आहे. दोन महिने पगार झाले नसल्यामुळे हाल सुरू आहेत. राज्य सरकारने माणुसकीच्या भावनेतून पगारासाठी पॅकेज देण्याची गरज आहे. कोरोनामुळे आर्थिक संकट निर्माण झाले आहे, अशी प्रतिक्रिया एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक खोत यांनी दिली.