इस्लामपूर : आर्थिक अडचणीचे कारण सांगत, स्वतःच्या बहिणीसह मावशीला लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या मारुती जाधव या भामट्याने बेकायदेशीर बचत गट स्थापन करत, पाच वर्षांत गटातील कष्टकरी महिलांनाही १० लाख १५ हजार रुपयांचा चुना लावला. त्याच्याविरुद्ध तेजश्री संजय पाटील (४८, रा.लोणार गल्ली) यांनी शुक्रवारी रात्री फिर्याद दिली आहे. त्यामुळे त्याच्यावर फसवणुकीचा दुसरा गुन्हा नोंद करण्यात आला.
दरम्यान, पोलिसांनी त्याच्या कोठडीत न्यायालयाकडून आणखी चार दिवसांची वाढ करून घेतली. तीन वर्षांपूर्वी बहिणीकडील १३ तोळे सोन्याचे दागिने घेऊन तिची फसवणूक करणाऱ्या भामट्या जाधवने त्या अगोदर दोन वर्षे एखादी पतसंस्थाच चालवीत असल्याच्या थाटात मजुरी करणाऱ्या, शेतात राबणाऱ्या महिलांना घेऊन बेकायदेशीर बचत गटाची स्थापना केल्याचे आता उघडकीस आले आहे. त्याच्याविरुद्ध तेजश्री पाटील यांनी शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसात फिर्याद दिली आहे.
यामध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याने कष्टकरी महिलांना फसविले आहे. ऑक्टोबर, २०१६ मध्ये त्याने हा बचत गट स्थापन केला होता. त्यामध्ये गेल्या पाच वर्षांपासून महिला आर्थिक गुंतवणूक करत होत्या. मात्र, जाधवच्या पापाचा घडा फुटल्यानंतर फसवणूक झाल्याचे या महिलांच्या लक्षात आले. बचत गटाची छापील पुस्तकेही त्याने काढली होती. त्यामध्ये तो महिला भरत असलेल्या पैशाचा हिशेब ठेवत असल्याचा दिखावा करत होता. त्याच्याकडून कसलाही आर्थिक परतावा न झाल्याने, या महिलांनी पोलिसात धाव घेतली.
दरम्यान, मारुती जाधवच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने, शनिवारी त्याला पुन्हा न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते. न्यायालयाने कोठडीत चार दिवसांची वाढ केली. सहायक पोलीस उपनिरीक्षक बळीराम घुले अधिक तपास करत आहेत.
दुचाकी चोरी
जाधवने घराच्या परिसरातील दुचाकीची चोरी केल्याची चर्चा पुढे येऊ लागली आहे. त्यामुळे तो अट्टल आणि सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट होत आहे.