सांगली : येथील मार्केट यार्डातील कर्जबाजारी झालेल्या हळद व्यापाऱ्याने पलायन केले आहे. त्याच्याकडे शेतकऱ्यांसह अडते, व्यापाऱ्यांचे सुमारे कोटीवर देणे आहे. याबद्दल सांगली मार्केट यार्डात उलटसुलट चर्चा सुरू आहे; मात्र त्याच्याबाबत बाजार समितीकडे तक्रार नसल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.
मार्केट यार्डात कर्जबाजारी झाल्याने शेतकऱ्यांना बुडवून बेपत्ता होण्याचे व्यापाऱ्यांचे प्रकार दोन वर्षांत घडलेले नाहीत; मात्र आता यार्डातील एक हळद व्यापारी नुकताच बेपत्ता झाल्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. मिरज तालुक्याच्या पश्चिम भागातील या व्यापाऱ्याने गेल्या दोन वर्षांपूर्वी सांगली मार्केट यार्डात प्लॉट भाड्याने घेऊन हळदीचा व्यापार सुरु केला होता. सुरुवातीला त्याचा व्यवसाय चांगला सुरु होता; मात्र त्यानंतर आर्थिक फटका बसला. त्याने हळद विक्रीचा व्यवसाय कोकणातही केला. यामध्येही यश आले नाही. व्यसनातून शेतकऱ्यांची देणी थकली. इतरांकडून हातउसनवारी केली. खासगी सावकारांकडून पैसे घेतले. उलाढाल थांबल्याने कर्जाचा आकडा वाढत गेला. ही रक्कम कोटीवर गेली. देणे देण्यासाठी शेवटी त्याने जमीन विकायला काढली. दीड एकर जमीन विकली, मात्र यातून निम्मी देणीही भागली नाहीत. राहिलेल्या रकमेसाठी देणेकऱ्यांचा तगादा सुरू होता. ही रक्कम देणे शक्य होणार नसल्याने या व्यापाऱ्याने काही दिवसांपूर्वी पलायन केल्याची चर्चा आहे. दरम्यान, बाजार समितीकडे शेतकऱ्यांनी तक्रार केली नसल्याचे सांगण्यात आले.
चौकट
कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे पैसे वसूल
चार महिन्यांपूर्वी कडेगाव तालुक्यातील चार शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे तक्रार केली होती. संबंधित व्यापाऱ्याला बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी बोलावून तत्काळ रक्कम द्यावी अन्यथा अनामत जप्त करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर महिनाभरात या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना हळदपट्टी दिली होती.