आष्टा : आष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात येणार आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. लवकरच शिवाजी चौक या ठिकाणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष विशाल शिंदे यांनी पुतळा समितीच्या बैठकीत दिली.
विशाल शिंदे म्हणाले, माजी आमदार विलासराव शिंदे यांनी आष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या आकस्मित निधनामुळे व कोरोना संकटामुळे काही काळ काम थांबले होते. सध्या कोरोनाचे संकट कमी होत असल्याने लवकरच शिवाजी चौकातील जागेत भूमिपूजन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक त्या परवानग्या प्रशासकीय मान्यता घेण्यात येत आहेत. आष्टा नगरपालिकेने चबुतरा कामासाठी १५ लाख रुपये मंजूर केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा लोकवर्गणीतून उभारण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.
यावेळी झुंजारराव पाटील, प्रणव चौगुले, प्रकाश शिंदे-मिरजकर, धैर्यशील शिंदे व वीर कुदळे यांनी मनोगत व्यक्त केले. उद्योजक नितीन झंवर, नगराध्यक्षा स्नेहा माळी, अमोल पडळकर, संकेत पाटील, नंदकुमार बसुगडे, राकेश आटुगडे यांच्यासह पुतळा समितीचे सदस्य उपस्थित होते.
फोटो-११आष्टा१
फोटो: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीच्या बैठकीत विशाल शिंदे, वैभव शिंदे, झुंजारराव पाटील, नितीन झंवर, प्रकाश शिंदे-मिरजकर आदींसह सदस्य उपस्थित होते.