सांगली : शहरातील जुना बुधगाव रोडवरील संभाजीनगर येथे चोरट्यांनी घरात घुसून दोन मोबाईल, रोकड आणि सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास केला. रविवारी मध्यरात्री हा चोरीचा प्रकार घडला. याप्रकरणी रमेश भालचंद्र पोतदार (वय ४१) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी पोतदार यांच्या शेजारीच त्यांचे मेहुणे दादासाहेब विठ्ठल पोतदार राहण्यास आहेत. दोन्ही घरांमध्ये सामायिक भिंत आहे. चोरट्यांनी दरवाजाच्या आतून लावलेली काडी काढून आता प्रवेश करत दोन मोबाईल, दीड हजार रुपयांची रोकड चोरली. फिर्यादी पोतदार यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्रास हिसडा मारण्याचा प्रयत्न केल्याने त्या जाग्या झाल्या. आरडाओरडा केल्यानंतर चोरटे पसार झाले. त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु ते अंधारात पसार झाले. त्यानंतर पोतदार यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.