फोटो ओळ : शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे अखिल भारतीय किसान सभेच्या आंदोलनस्थळी आमदार सुमनताई पाटील यांनी भेट देऊन चर्चा केली.
शिरढोण : शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत बाधित शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन बुधवारी २७ व्या दिवशीही सुरू आहे. आमदार सुमनताई पाटील यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करुन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. मात्र मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन सुरू आहे.
आ. सुमनताई पाटील म्हणाल्या की, शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात प्रांताधिकारी यांच्याशी दोनवेळा चर्चा केली आहे. सर्व निवाडा नोटीस देणार आहे. आपण सर्व पुढील मंगळवारी यासंदर्भात एकत्रित बैठक घेऊ. तोपर्यंत आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती त्यांनी आंदोलकांना केली. मात्र शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहत आंदोलन मागे न घेण्याचे स्पष्ट केले.
किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस दिगंबर कांबळे यांनी आमदार सुमनताई पाटील यांना आंदोलकांच्या मागण्यांबाबत माहिती दिली. बाधित क्षेत्रात झालेल्या शेतकऱ्यांना पुनसर्व्हेच्या निवाडा नोटीस व नव्याने बाधित शेतकऱ्यांच्या निवाडा नोटीस तातडीने द्या, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष टी. व्ही. पाटील, दिग्विजय खानविलकर, मंडल अधिकारी गब्बरसिंग गारळे व बाधित शेतकरी उपस्थित होते.