जयहिंद विकास सोसायटीतील गैरकारभाराची तक्रार सदानंद कबाडगे यांच्यासह इतर सभासदांनी केली होती. चौकशीत संस्थेतील गैरकारभाराची प्रकरणे उघड होत आहेत. संस्थेचे सभासद पांडुरंग केदारी घोलप यांना द्राक्षबागेसाठी २ लाख ८० हजार रूपयाचे साधे पीक कर्ज मंजूर होते पैकी घोलप यांनी ४५ हजार रुपये घेतले व इतर २ लाख ३५ हजार रुपयांची रक्कम मालगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जफेडीच्या खात्यावर वर्ग केली. मात्र, घोलप यांना २ लाख ३५ हजार रुपयांच्या कर्जफेडीच्या पावत्या न देता याच रकमेच्या इतर कर्जदार सभासद राजाराम ज्योती माळी यांच्या नावे १ लाख ३५ हजार व शिवानंद शिवरूद्र तवटे यांच्या नावे १ लाख रुपयांच्या कर्जफेडीच्या पावत्या काढल्या.
माळी व तवटे यांच्याकडून वसूल केलेली २ लाख ३५ हजारांची रक्कम संस्थेत जमा न करता संस्थेचे सचिव रंगराव चव्हाण यांच्यासह फारूक मन्सूर मुजावर व बाळासाहेब गणपती खरात या दोघा लिपिकांनी संगनमताने परस्पर हडप करून अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
चौकट
सचिवांच्या कारभारावर ताशेरे
संस्थेचे कर्जदार सभासद पांडुरंग घोलप यांनी भरणा केलेल्या रकमेत अपहार झाल्याने त्यांनी काढलेल्या कर्जाचा बोजा कायम असताना कोलप यांच्या शेतजमिनीवरचा कर्जाचा बोजा कमी करण्याचे सचिव चव्हाण यांनी तलाठ्यांना पत्र दिले. यातून घोटाळ्यात आणखी भर घातल्याचे उघड झाल्याने सचिवाच्या बेजबाबदार कारभारावरही उपनिबंधकांनी ताशेरे ओढले आहेत.