मिरज : मिरजेतील झारी बाग परिसरात जुन्या इमारतीच्या कुंपणाची भिंत कोसळल्याने अकरा शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
चिवटे कॉलनीत डॉ. मोहन भट यांच्या जुन्या घरात प्रकाश यल्लप्पा पाटील (वय ४५) गेली अनेक वर्षे वास्तव्यास आहेत. प्रकाश पाटील हे शेती व शेळीपालन व्यवसाय करतात. त्यांच्या सुमारे ४० ते ५० शेळ्या आहेत. मंगळवारी रात्री ८ वाजता १२ फुटी मातीची कुंपणाची भिंत कोसळून भिंतीलगत असलेल्या अकरा शेळ्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्याने जागीच मृत्यू पावल्या, तर एक रेडकू यात जखमी झाले. जीर्ण व धोकादायक भिंतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाला.
मृत शेळ्यांची सकाळी परिसरात दुर्गंधी पसरल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारी सकाळी सर्व मृत शेळ्यांचे दफन करून परिसराची स्वच्छता केली. या अपघातात प्रकाश पाटील यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.