सांगली : महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी दिनांक २२ फेब्रुवारी रोजी निवडणूक होण्याची शक्यता आहे. विभागीय आयुक्तांकडून लवकरच निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. पुढील अडीच वर्षांसाठी महापौरपद खुले असल्याने सत्ताधारी भाजपसह काँग्रेस व राष्ट्रवादीत इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.
विद्यमान महापौर गीता सुतार व उपमहापौर आनंदा देवमाने यांची मुदत २१ फेब्रुवारी रोजी संपत आहे. गेल्या आठवड्यात महापालिका प्रशासनाने महापौर व उपमहापौर पदांच्या निवडीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवला आहे. या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांची नियुक्ती होणार आहे. डुडी यांनी दिनांक २२ अथवा २३ रोजी निवडीसाठी उपलब्ध असल्याचे विभागीय आयुक्तांना कळविले आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडी याचदिवशी होतील, अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज करण्याची मुदत १८ फेब्रुवारी असेल. त्यानंतर सलग तीन दिवस शासकीय सुट्टी आहे. त्यामुळे २२ फेब्रुवारी रोजी नव्या महापौर व उपमहापौरांची निवड होईल, असे सांगण्यात येत आहे.
पुढील अडीच वर्षे महापौरपद खुले असल्याने सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी आहे. सत्ताधारी भाजपमधून निरंजन आवटी, युवराज बावडेकर, स्वाती शिंदे, धीरज सूर्यवंशी यांची नावे आघाडीवर आहेत. तर काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, मंगेश चव्हाण, राष्ट्रवादीतून मैनुद्दीन बागवान, दिग्वीजय सूर्यवंशी, विष्णू माने यांनी तयारी चालवली आहे. भाजपमध्ये नाराजीचे पेव फुटले असून, विरोधकांनी या असंतुष्टांना जाळ्यात ओढण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे यंदा महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक चुरशीची होणार आहे.