सांगली : महापालिकेच्या नव्या महापौर व उपमहापौरांची २३ फेब्रुवारी रोजी निवड होणार आहे. मंगळवारी विभागीय आयुक्तांनी या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला. या दोन्ही पदांसाठी १८ रोजी अर्ज भरण्याची मुदत आहे. आता निवडीच्या तारखा जाहीर झाल्याने सत्ताधारी भाजपसह विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादीनेही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
महापालिकेच्या पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपद महिला ओबीसीसाठी आरक्षित होते. सत्ताधारी भाजपने संगीता खोत व गीता सुतार यांना संधी दिली. विद्यमान महापौर, उपमहापौरांची मुदत २१ रोजी संपत आहे. आता महापौरपद खुले झाल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. विभागीय आयुक्तांनी २३ रोजी या निवडी घेण्याचे आदेश दिले असून, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुडी यांची नियुक्ती केली आहे. निवडीची सभा ऑनलाइन होणार असून, दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत १८ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.
महापौर निवडीची तारीख निश्चित झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी भाजपसह विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकांनी गेल्या काही दिवसांपासून महापौरपदासाठी फिल्डिंग लावली आहे. सत्ताधारी भाजपमध्येही इच्छुकांची संख्या मोठी आहे, तर विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीनेही महापौरपदाची निवडणूक लढविण्याची रणनीती आखली आहे. नुकतेच काँग्रेस नगरसेवकांची बैठक कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत झाली. आता गुरुवारी पुन्हा मुंबईत बैठक होत आहे. भाजपमधील नाराजांच्या जिवावर काँग्रेस, राष्ट्रवादी महापौरपदाचा डाव मांडणार आहेत.
चौकट
महापालिकेतील पक्षीय बलाबल
भाजप -- ४३
काँगेस -१९
राष्ट्रवादी - १५
रिक्त : १
एकूण - ७८
चौकट
महापौरसाठी इच्छुक
भाजप - गीता सुतार, निरंजन आवटी, युवराज बावडेकर, धीरज सूर्यवंशी, स्वाती शिंदे
काँग्रेस - उत्तम साखळकर, मंगेश चव्हाण, संतोष पाटील
राष्ट्रवादी - मैनोद्दीन बागवान, दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने