लोकमत न्यूज नेटवर्क
ऐतवडे बुद्रुक : कार्वे (ता. वाळवा) येथे महादेवाचे पुरातन मंदिर सुमारे ८०० वर्षे जुने असल्याचे पुरातत्वशास्त्र अभ्यासक, इतिहासतज्ज्ञांनी सांगितले. मंदिराविषयीच्या अज्ञान आणि अपुऱ्या माहितीमुळे गावकऱ्यांनी ते पाडण्याचा निर्णय घेतला होता. तेथे नवीन मंदिर व सभामंडप बांधण्याचा विचार होता.
कार्वेतील मंदिराबाबत शेजारच्या कापरी गावचे इतिहास अभ्यासक अमोल पाटील, प्रसाद पाटील तसेच भाटशिरगाव येथील कैलास देसाई यांना समजले. त्यांनी तात्काळ मंदिराला भेट देऊन पाहणी केली असता ते पुरातन असून तेथे विरगळही आढळले. मंदिरात पुरातन शिवलिंग, नागशिल्प, पिंडीवरील गणपती, नंदी, नक्षीदार स्तंभ व शिलालेख दिसून आले. याची माहिती पुरातत्वशास्त्र अभ्यासक सचिन पाटील, इतिहास संशोधक प्रा. सतीश चौगुले, प्रा. के. आर. गावडे, सचिन पाटील यांना दिली. त्यांनी पाहणी केली असता हे मंदिर सुमारे ८०० वर्षे जुने असल्याचे सांगितले. गावकऱ्यांनी जुने मंदिर पाडून तेथे नवीन मंदिर व सभामंडप बांधण्याचे ठरवले होते. मात्र, अभ्यासक, इतिहासतज्ज्ञांनी गावकऱ्यांची बैठक घेऊन याची माहिती दिली. मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व, वारसा आणि पुरातत्वीय ठेवा जतन करण्याची विनंती केली.
गावकऱ्यांनीही मंदिराबद्दलच्या अज्ञान व अजाणतेपणातून असा विचार मनात आल्याचे सांगितले. गावचा इतिहास व ऐतिहासिक ठेवा उजेडात आणून, प्रबोधन करून मंदिर पाडण्यापासून वाचवल्याचे सांगून आभार मानले व मंदिर न पाडता त्याचे संवर्धन करणार असल्याचे अभिवचन दिले.
या बैठकीत मंदिराचे सखोल संशोधन व शास्रोक्त पद्धतीने संवर्धन आणि डागडुजी करण्याबाबत चर्चा झाली. या कार्यक्रमास माजी सरपंच विठ्ठल मुदुगडे, माजी उपसरपंच केशव पाटील, सर्जेराव भगत, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नागनाथ पाटील, रघुनाथ पानिरे, सीताराम चव्हाण उपस्थित होते. बैठकीचे आयोजन जय हनुमान मंडळाने केले होते.