देवराष्ट्रे :
यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला दिशा दिली. आज जो महाराष्ट्र उभा आहे, त्यामध्ये यशवंतरावांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या विचारानेच महाराष्ट्राची वाटचाल सुरू असून औद्योगिकीकरण व सहकाराच्या माध्यमातून देशात राज्य अग्रेसर राहिले. त्यांच्या जन्मघर स्मारकासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघरास त्यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, विशाल पाटील आदी उपस्थित होते.
एच. के. पाटील म्हणाले की, यशवंतरावांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्त्व याच्याशी निगडित आहेत. त्यांनी कृषिविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकी हक्काचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला.
सतेज पाटील म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपट पाहून काम करण्याची ऊर्जा मिळाली.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, दाजी दाईंगडे, सरपंच प्रकाश मोरे, माजी उपसभापती मोहन मोरे, आनंदराव मोरे, प्रमोद गावडे, जयकर पवार, राहुल मोहिते, कैलास शिरतोडे, दिलीप जाधव, ग्रामसेवक उत्तम पाटील उपस्थित होते.